हल्लेखोरांना धडा शिकवणार   

नवी दिल्ली : पहलगाम भ्याड हल्ल्यात सहभागी असलेल्यांना लवकरच धडा शिकवला जाईल, असा स्पष्ट इशारा संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह यांनी बुधवारी दिला. अशा भ्याड हल्ल्यांना भारत घाबरणार नाही. त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ, असेही ते म्हणाले.पहलगाममध्ये विशिष्ट धर्माला लक्ष्य करुन दहशतवाद्यांनी भ्याड कृत्य केले. यात अनेक निष्पापांना प्राण गमवावे लागले. सरकार सर्व आवश्यक ती सर्व पावले उचलेल. हल्लेखोरांना तर शोधून काढूच. पण, पडद्यामागे राहून ज्यांनी घृणास्पद कृत्याचे कारस्थान रचले, त्यांनाही शोधून काढू, अशी ग्वाही राजनाथ यांनी एका कार्यक्रमात देशवासीयांना दिली.
 
या कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी राजनाथ यांनी उच्च स्तरीय अधिकार्‍यांची बैठक घेतली.या बैठकीस राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, तीनही दलांचे प्रमुख अनिल चौहान, हवाई दल प्रमुख ए.पी. सिंह, लष्कर  प्रमुख जनरल उपेंद्र दिवेदी आणि नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी संरक्षण सचिव आदी उपस्थित होते. सुमारे तीन तास ही बैठक चालली. या बैठकीत संरक्षण मंत्र्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, दहशतवादविरोधी कारवाया तीव्र करण्याचे निर्देश दिले. यासोबतच, हल्लेखोरांना तातडीने पकडण्याचे आदेश दिले.
 
या अमानवी कृत्याने संपूर्ण देश अतिशय दु:खात आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, अशा सर्व कुटुंबांप्रति संवेदना व्यक्त करतो, असे राजनाथ म्हणाले. 
 

Related Articles